सिंधुदुर्ग / निलेश जोशी : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे महत्वाकांक्षी स्वप्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे विमानतळ असे नाव देण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर केली आहे.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ पूर्णत्वास जात असून येत्या २६ जानेवारीला या विमानतळाचे उदघाटन होण्याचे संकेत मिळत आहेत. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्गात विमानतळ उभारण्याची संकल्पना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मांडली होती. त्यांच्या कारकिर्दीत या विमानतळाचे काम सुरू करून बहुतांश काम करण्यात आले. मात्र मागील काही वर्ष हे काम रखडले होते.
सन्माननीय नारायण राणे साहेब हे मा. बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हे खा. राणे साहेबांचा Dream Project आहे.. म्हणून या विमानतळाला "स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ" हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे!!
— nitesh rane (@NiteshNRane) December 20, 2020
आता विमानतळाचा शुभारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी राणेंचे सुपूत्र आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हे खासदार राणे यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणून या विमानतळाला स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ हे नाव दिले पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे. असे ट्विट आमदार राणे यांनी केले आहे.