पालघर : पीसीव्ही अर्थात न्युमोकॉक्कल कॉंज्यूगेट ( Pneumococcal Conjugate Vaccine ) ही नवीन लस नवजात बालकांच्या नियमित लसीकरणामध्ये समाविष्ट होणार आहे. येत्या १२ जुलै पासून महाराष्ट्रात सर्वत्र पीसीव्ही लसीकरण कार्यक्रम सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्या अनुषांगानं जिल्ह्यात न्युमोकॉक्कल कॉंज्यूगेट लसीचे पहिले २३०० डोज दाखल झाले असून लवकरच लवजात बालकांना ही लस देण्यात येईल अशी माहिती डॉ. मिलिंद चव्हाण यांनी दिली आहे.
महिन्याला जन्मतात जवळपास २३०० – २४०० बालकं :
जिल्ह्यात महिन्याला जवळपास २३०० – २४०० बालकं जन्माला येतात. त्यानुसार सध्या न्युमोकॉक्कल कॉंज्यूगेट लसीचे २३०० डोज जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आणि पहिल्यांदा दिड महिन्याच्या नवजात बालकाला ही लस दिली जाणार आहे. ही लस दिल्यानं लहान मुलांचा न्यूमोनिया, कानाचे आजार यासारख्या जवळपास पाच आजारांपासून बचाव होवू शकेल. या लसीकरणाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्ह्यात कार्यालयात नुकतीच सुरुवात झाली असून जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर हे प्रशिक्षण देवून पूर्ण झालं आहे. तर आज आणि उद्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर नर्सेस तसचं आशा वर्कर्स देखील हे लसीकरण प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मिलिंद चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात ग्रामीण भागांत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांच्या ठिकाणी तर वसई – विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि बाह्य लसीकरण केंद्रांवर हे पीसीव्ही लसीकरण मोफत सुरु करण्यात येणार आहे. या लसीकरणाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन चे डॉक्टर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्सेस आदी सहभागी होत्या. आज आणि उद्या दोन दिवसांत यात आशा वर्कर्स देखील सहभागी होणार आहेत.
आतापर्यंत लहान मुलांना बीसीजी, पोलिओ, पेंटाव्हॅलंट, हिपॅटायटीस बी, गोवर, रूबेला, रोटा वायरस आणि टीडी सारख्या लसी दिल्या जात होत्या. मात्र आता यात न्युमोकॉक्कल कॉंज्यूगेट या नव्या लसीचा समावेश करण्यात आला आहे. ही लस लहान मुलांना पहिल्यांदा दिड महिन्यात, त्यानंतर साडे तीन महिन्यात आणि त्यानंतर नवव्या महिन्यात देण्यात येणार आहे.
न्युमोकॉक्कल या बॅक्टेरियानं होणाऱ्या न्युमोनियामुळे भारतात दरवर्षी १५.९ टक्के बालकांचा मृत्यू होत आहे. या रोगापासून बालकांचं संरक्षण व्हावं या हेतूनं हे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. बालकांसाठी महत्वाचं असणारं हे लसीकरण पूर्णत: मोफत असणार आहे.
लवकरच लवजात बालकांना देण्यात येईल ही लस :
पाच वर्षाच्या आतील विशेषत्वानं दोन वर्षाच्या आतील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी केंद्रीय स्तरावरून देशभरात सर्वत्र २०१७ पासून हा लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. ही लस अत्यंत सुरक्षित असून भारतासहित १४६ देशांमध्ये हे लसीकरण सुरु आहे. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये हे लसीकरण सुरु झाले आहे. शक्य असल्यास येत्या १२ जुलै पासून महाराष्ट्रात सर्वत्र पीसीव्ही लसीकरण कार्यक्रम सुरु होऊ शकेल.