पालघर : थकीत बिलापोटी खंडित केलेला ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, दमदाटी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या सफाळया मधल्या तांदुळवाडी-चावरेपाडा इथं ही घटना घडली.
पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्यानं वायरमन राहुल सपकाळ यांना आरोपी विजय सुदाम पालवा हा धमकावत होता. वीजबिल वसुलीचं काम करत असताना आरोपीनं वायरमन सपकाळ यांना धक्काबुक्की करून ग्रामस्थांसमोर शिवीगाळ केली. तसचं खंडित केलेला वीजपुरवठा वीजबिल न भरताचं अनधिकृतपणे सुरु करण्यास भाग पाडलं. तर पोलिसांकड़े तक्रार देऊ नये, यासाठीही आरोपीकडून धमकावण्यात आलं अशी माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे.
वायरमन सपकाळ यांच्या फिर्यादीवरून सफाळे पोलीस ठाण्यात आरोपी पालवा याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा), ५०४ व ५०६ (शिवीगाळ व दमदाटी) नुसार गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.
त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना त्यांचं कर्तव्य बजावण्यात सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.